
नाशिक शहर आणि धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.गंगापूर धरण आणि इतर पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक महानगरपालिका व प्रशासनाने गोदाघाट परिसरातील टपऱ्या आणि दुकाने सुरक्षित स्थळी हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नदीकाठच्या रहिवाशांना आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
