
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असून, ब्रह्मगिरी फेरीसाठी तब्बल साडेचार लाखांहून अधिक भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला जात असला, तरी शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे, खोदकामे, चिखल, अपुरी स्वच्छतागृहे आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे भाविकांच्या गैरसोयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण एक महिन्यात दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. त्यातच तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या ब्रह्मगिरी फेरीला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दोन टप्प्यांत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पर भाविकांच्या शारीरिक क्षमतेनुसार ब्रह्मगिरी फेरी दोन प्रकारे केली जाते. पहिली फेरी सुमारे २० ते २१ किलोमीटरची आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त कुंड, गौतम ऋषी आश्रम, ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याची प्रदक्षिणा, प्रयागतीर्थ, परशुराम मंदिर आणि पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिर असा या फेरीचा मार्ग आहे. तर दुसरी फेरी सुमारे ४२ किलोमीटरची असून, त्र्यंबकेश्वर पंचलिंग, गंगाद्वार, लग्नस्तंभ, नीलपर्वताच्या मागील बाजूने पुढे हरिहर, हर्षकिल्ला, पायथा वेताळ आणि जुने सरोवर कुंड या परिसरातून ही प्रदक्षिणा केली जाते. निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या मार्गावरही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. पावसामुळे खोदलेल्या रस्त्यांवर चिखल आणि पाणी साचण्याची शक्यता आहे. परिणामी, पायी चालणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दर्शनरांगची स्वतंत्र व्यवस्था
श्रावणी सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांना दर्शनासाठी रांगेत थांबावे लागू नये, यासाठी गुरू गोरक्षनाथ मठाच्या मंडपात दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सर्व प्रकारचे सशुल्क दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
