नाशिक – अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी उपनगर येथील ‘सँडी बेकर्स’चा अन्न व्यवसाय परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला आहे. शहरातील मुख्य ठिकाणांसह मालेगाव परिसरातील विविध अन्न आस्थापनांवर धाडी टाकून तब्बल १९ लाख ९४ हजार ४८६ रुपये किमतीचा संशयास्पद, भेसळयुक्त व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
चौक मंडई, जुने नाशिक येथील ‘मेसर्स भारत जनरल स्टोअर’वर कारवाई करून १ लाख १ हजार ७२६ रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित दुकान सील करण्यात आले आहे. तसेच आडगाव येथील जत्रा हॉटेल परिसरातील ‘मेसर्स स्वागतम स्वीट्स’ येथून ५ हजार ७६० रुपये किमतीचे ९ किलो निकृष्ट व भेसळयुक्त संशयित गायीचे तूप जप्त करण्यात आले.
