
मुंबई दहशतवाद विरोधी पथकातून (एटीएस) बोलत असल्याचा बनाव रचून, नाशिकमधील (Nashik) एका वयोवृद्ध मॅनेजरला डिजिटल अरेस्टची भिती दाखवून तब्बल ८९ लाख ९९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. सातपूर (Satpur) येथील एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत कार्यरत असलेल्या या वयाेवृद्ध अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चाेरट्यांनी (Cyber Thieves) पीडित मॅनेजरशी व्हॉट्सॲप क्रमांकांवरून (७५००१२०१३८, ८८९५८६३६२५, ९४५५८२८५७३, ८८९५७५७१९५) संपर्क साधला. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून जम्मू येथील एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. हे खाते दहशतवादी आदिल गौरीने मनी लाँड्रिंगसाठी वापरले असून, या गुन्ह्यात तुमचाही सहभाग आहे, अशी भीती संशयितांनी दाखविली. त्यानंतर, तुमच्या सर्व आर्थिक व स्थावर मालमत्तेची माहिती द्यावी लागेल तसेच बँक खात्यातील (Bank Account) सर्व रक्कम आरबीआयमार्फत तपासावी लागेल, असे सांगून त्यांना डिजिटल अरेस्टखाली ठेवले. अटकेच्या व कायदेशीर कारवाईच्या भीतीपोटी मॅनेजरने चाेरट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर टप्प्याटप्प्याने एकूण ८९ लाख ९९ हजार रुपये वर्ग केले. हा प्रकार १७ ऑगस्ट २०२५ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला. त्यामुळे मॅनेजरचे बँक खाते रिकामे झाले आहे.
