
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक : देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चा औपचारिक शुभारंभ शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते नाशिकमधील गोदावरी नदीच्या तीरावरील रामकुंड येथे धर्मध्वजारोहण करण्यात आले. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने सिंहस्थ पर्वाला औपचारिक सुरुवात झाली.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, साधू-महंत, आखाड्यांचे प्रतिनिधी आणि हजारो भाविक उपस्थित होते.
धर्मध्वजारोहणापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यज्ञकुंडात धार्मिक विधी केले. त्यानंतर गोदावरी मातेचे पूजन करून धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या गजरात धर्मध्वज फडकविण्यात आला. यावेळी संपूर्ण रामकुंड परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
दरम्यान, नाशिकपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वतंत्र धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विदुशेखर भारती यांच्यासह अनेक धार्मिक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींनीही त्र्यंबकेश्वर येथे जाऊन कुशावर्त तीर्थावर ध्वजपूजन आणि धार्मिक विधी केले.
राष्ट्रपतींचा सांस्कृतिक एकतेचा संदेश
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुंभमेळ्याच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. कुंभमेळ्यात देशभरातून एकत्र येणारे असंख्य भाविक हे भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे जिवंत प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा प्राचीन वारसा आणि आधुनिक काळ यांच्यातील दुवा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच कुंभमेळ्याच्या आयोजनात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाला विशेष महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.
२०२८ पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक कालावधी ऑक्टोबर २०२६ पासून जुलै २०२८ पर्यंत राहणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२७ मध्ये मुख्य अमृतस्नान पर्व होणार असून देशभरातून मोठ्या संख्येने साधू-महंत आणि भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे.
धर्मध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाला सुरुवात झाली असून आता संपूर्ण देशाचे लक्ष नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे लागले आहे
