
नाशिक शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि प्रवास अधिक जलद करण्यासाठी महा मेट्रोकडून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पाथर्डी फाटा ते ओझर विमानतळ या सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव महा मेट्रोच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यात (CMP) समाविष्ट करण्यात आला आहे.हा मार्ग पाथर्डी फाटा, मुंबई नाका, अंबड एमआयडीसी आणि ओझर विमानतळ या प्रमुख भागांना जोडणार आहे. यामुळे केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी आणि विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या आराखड्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या जाणार असून, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाईल. नाशिकच्या भविष्यातील विकासासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

