
नाशिक : नाशिक महापालिकेच्या घंटागाडीवरील सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी घंटागाडी कामगारांनी नाशिक महापालिकेसमोर (दि. २३) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात शहराच्या स्वच्छतेची अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याने त्यापूर्वी सेवेत कायम करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे. विशेष म्हणजे, काम बंद न करता सुट्टीच्या दिवशी तसेच काम संपल्यानंतर हे आंदोलन करण्यात येत आहे.
महापालिकेत १९९६ पासून घंटागाडीवरील सफाई कामगार कचरा संकलन आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करीत आहेत. ही अत्यावश्यक आणि कायमस्वरूपी स्वरूपाची सेवा असून ठेकेदार बदलले तरी तेच कामगार काम करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. २०१६ मध्ये न्यायालयाने या कामगारांना कायम कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्याच वर्षी कामगार उपायुक्तांनी सात टप्प्यांत कायम सेवेत घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा संघटनेने केला आहे. महापालिकेच्या महासभेनेही २०१६ मध्ये यासंदर्भात ठराव मंजूर केला होता. मात्र तांत्रिक मुद्द्यांमुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने निर्णय रखडल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
नुकतेच उपमहापौर विलास शिंदे यांनीही कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त मनीषा खत्री यांना यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याची सूचना केल्याचे संघटनेने सांगितले. मागील कुंभमेळ्यात या कामगारांनी रात्रंदिवस काम करून स्वच्छता राखली. चिकुनगुनिया, स्वाइन फ्ल्यू आणि कोरोना महामारीच्या काळातही जीवाची पर्वा न करता सेवा दिली. या काळात विविध आजारांमुळे ६० ते ६२ कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. आगामी कुंभमेळ्यात सुमारे दहा कोटी भाविक येण्याची शक्यता असून कामाचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे कायम सेवेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षासह कॉकरोच जनता पार्टीने पाठिंबा दिला. आंदोलनात उपाध्यक्ष महादेव खुडे, रफिक सैय्यद, शरद अहिरे, कैलास मोरे, नितीन निराळे, सुरेश गायकवाड, दिनेश वाघ आणि पूनमचंद शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले.
