
धुळे -: राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिराचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेत पवार कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.शंभूपुरा गावाजवळ भीषण अपघातमिळालेल्या वृत्तानुसार, कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांच्या क्रूझर वाहनाची महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तीन वाहनांतून निघाले होते नातेवाईकधुळे जिल्ह्यातील पवार कुटुंबातील नातेवाईक धार्मिक यात्रेसाठी तीन वेगवेगळ्या वाहनांतून राजस्थानला गेले होते. या यात्रेदरम्यान त्यांनी उज्जैन, ओंकारेश्वर, पुष्कर, सालासार बालाजी आणि खाटू श्यामजी अशा विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले होते. दर्शन पूर्ण करून घरी परतत असताना एका वाहनाला अपघात झाला.अपघातातील मृतांची नावेया दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.१. उषाबाई सजन पवार (वय ६० वर्षे)२. सान्वी गणेश पवार (वय ६ वर्षे)३. सजन दौलत पवार (वय ७० वर्षे)४. माधवी गणेश पवार (वय ४५ वर्षे)५. कैलास भगवान पवार (वय ४५ वर्षे)६. अनिता कैलास पवार (वय ४० वर्षे)७. जान्हवी कैलास पवार (वय १३ वर्षे)८. बाबूलाल दौलत पवार (वय ६३ वर्षे)९. सुशीलाबाई बाबूलाल पवार (वय ६५ वर्षे)महाराष्ट्र सरकारकडून मदतीसाठी प्रयत्नअपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राजस्थानमधील प्रशासनाशी संपर्क साधला. जखमींना योग्य उपचार मिळावेत तसेच मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला.खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसराला मोठा धक्का बसला आहे.
