
पीएम-१० आणि पीएम-२.५ चे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक; १५ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश
नाशिक : गोदावरी नदीकिनारी असलेल्या वॉटर ग्रेस कंपनीच्या मेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराचा आणि वायुप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत प्रकल्पाच्या प्रदूषण नियंत्रण यंत्रणेत त्रुटी आढळून आल्याने मंडळाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या अटींचे पालन न केल्याप्रकरणी प्रकल्पाचे काम बंद का करू नये, तसेच वीज आणि पाणीपुरवठा का खंडित करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. यावर १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत.गोदावरी नदी प्रदूषणमुक्त उपसमितीचे सदस्य निशिकांत पगारे यांनी प्रकल्पातून निघणाऱ्या काळ्या धुराबाबत तक्रार केली होती. २ सप्टेंबर २०२६ रोजी समितीच्या सदस्यांसोबत गोदावरी नदीतील पाण्याचे नमुने घेत असताना नदीकिनारी असलेल्या वॉटर ग्रेसच्या पाइपमधून मोठ्या प्रमाणात काळा धूर बाहेर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या धुरामुळे परिसरातील हवेचे प्रदूषण होत असल्याचा आक्षेप घेत त्यांनी कारवाईची मागणी केली होती.या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी चिमणीतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे आढळले. तसेच २४ तास फिरत्या वाहनाद्वारे हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात आले. त्यात पीएम-१० चे प्रमाण १३६, तर पीएम-२.५ चे प्रमाण ९७ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर नोंदविण्यात आले. ही दोन्ही प्रमाणे कंपनीला दिलेल्या संमतीतील निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे मंडळाने नोटिशीत नमूद केले आहे. तसेच वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणाही कार्यक्षमतेने चालविली जात नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.कठोर कारवाईची मागणीकेवळ नोटीस बजावून थांबता कामा नये. प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची सखोल तपासणी करून नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करावी. काझीगढीतील नागरिकांच्या आरोग्याचा आणि गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न असल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी निशिकांत पगारे यांनी केली आहे.
