
त्र्यंबकेश्वरमधील ४८ आश्रमांना मिळणार प्रत्येकी १५ लाखांचा निधी; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग!
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील आश्रम संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर शहर आणि तालुक्यातील तब्बल ४८ आश्रम संस्थांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या सर्व प्रस्तावांची एकूण रक्कम ७ कोटी २० लाख रुपये इतकी आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान देशभरातून मोठ्या संख्येने साधू-महंत, संत आणि भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आश्रमांमधील निवास व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे.
आखाड्यांनंतर आश्रम संस्थांसाठीही निधीची प्रक्रिया
यापूर्वी त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांना त्यांच्या अंतर्गत विकासकामांसाठी प्रत्येकी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता आखाड्यांपाठोपाठ आश्रम संस्थांनाही आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
यासंदर्भात आयोजित बैठकीत साधू-महंत आणि आश्रम संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. आश्रमांमध्ये भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे लवकर सुरू करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शासनाच्या मंजुरीकडे लक्ष
या बैठकीला कुंभमेळा आयुक्तांसह नगरपालिका प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आश्रम संस्थांकडून मांडण्यात आलेल्या गरजा आणि विकासकामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ४८ संस्थांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
आता या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर निधी वितरण आणि प्रत्यक्ष विकासकामांचा मार्ग मोकळा होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमधील धार्मिक संस्था आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
