
नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेता नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे विशेष नियोजन केले असून, शहरातील सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी रविवार कारंजा, मेन रोड, शालिमार, दहिपूल, नेपाळी कॉर्नर आणि सांगली बँक सिग्नल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पोलीस उपायुक्त (मुख्यालय व वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी यासंदर्भात वाहतूक बदलांची अधिसूचना जारी केली आहे.
कोणते सात मार्ग राहणार बंद?
दिवाळीच्या काळात बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी खालील मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
१. मालेगाव स्टँड ते रविवार कारंजा या मार्गावर मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी.
२. दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंट.
३. रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर.
४. बालाजी मंदिर ते गाडगे महाराज पुतळा.
५. नेपाळी कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, मेन रोडमार्गे धुमाळ पॉईंट.
६. सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट.
७. रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट.
या मार्गांवरील वाहतूक निर्बंधांमुळे वाहनचालकांनी बाजारपेठेत जाण्यापूर्वी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग कोणते?
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत.
मालेगाव स्टँड परिसरातून येणाऱ्यांसाठी : म्हसरूळ, मखमलाबाद नाका, रामवाडी, बैजबाई छावणी, चोपडा लॉन्स आणि गंगापूर नाका या मार्गाचा वापर करता येईल.
पंचवटी परिसरातून येणाऱ्यांसाठी : मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी संतोष टी पॉईंट आणि द्वारका मार्गाचा वापर करावा.
जुने नाशिक परिसरातून प्रवास करणाऱ्यांसाठी : सीबीएस, शालिमार, खडकाळी सिग्नल आणि सारडा सर्कल या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था
मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्किंगची अडचण होऊ नये यासाठी काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
- बी. डी. भालेकर मैदान, शालिमार
- रविवार कारंजा परिसर
- गोदाघाट परिसर
- गाडगे महाराज पुलाखालील जागा
- स्मार्ट सिटीने निश्चित केलेल्या पार्किंगच्या जागा
नागरिकांनी आपली वाहने केवळ निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
वाहतूक पोलिसांनी लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी.
दरम्यान, पोलीस विभाग, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शववाहिका आणि अत्यावश्यक व आपत्कालीन सेवांच्या वाहनांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
नाशिककरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतूक बदल जाणून घ्या!
दिवाळीच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांनी शक्यतो आपली वाहने निर्धारित पार्किंगमध्ये उभी करून पुढील प्रवासाचे नियोजन करावे. गर्दीच्या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाचे : वाहतूक निर्बंधांचा कालावधी – ३ ते ११ नोव्हेंबर २०२६ | वेळ – सकाळी १० ते रात्री १०.
