पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सहा महिलांना लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. गोदाघाटावर आयोजित करण्यात आलेल्या आरती कार्यक्रमादरम्यान चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दागिने हातोहात लंपास केले. या घटनेत एकूण सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. शनिवारी (दि. ३१) सायंकाळी गोदाघाटावर गोदा आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी जमली होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सहा महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर हात साफ केला. यामध्ये मंगळसूत्रांसह अन्य सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी कोणार्कनगर परिसरात राहणाऱ्या मनिषा वाळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदा आरती आणि म्हसोबा महाराज पटांगणात आयोजित कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना गर्दीचा फटका बसला. एकाच वेळी सहा महिलांचे दागिने चोरीला गेल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.