
राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांची एका नामांकित सराफाने तब्बल कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुप्पट सोन्याचे आमिष दाखवून सराफाने त्यांच्याकडून तब्बल २०० तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित सराफ व्यवसायिकाने मुर्तडक यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांशी जवळीक साधून विश्वास संपादन केला होता. “तुमच्याकडील जुने सोन्याचे दागिने मला द्या, मी त्यावर आकर्षक योजना लागू करून त्याचे वजन दुप्पट करून देतो किंवा नव्या डिझाईनचे जास्त वजनाचे दागिने बनवून देतो,” असे आमिष या भामट्याने दाखवले होते. या आमिषाला बळी पडून मुर्तडक यांच्या कुटुंबाने टप्प्याटप्प्याने तब्बल २०० तोळे सोन्याचे दागिने या सराफाकडे सुपूर्द केले.
मात्र, अनेक महिने उलटूनही सोने परत न मिळाल्याने आणि सराफ सतत टाळाटाळ करत असल्याने अखेर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुर्तडक यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नाशिकमधील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाला अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
