
जुलै महिन्याचा अर्धा अधिक काळ संपला असून जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला आहे. ठिकठिकाणी धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत असतानाच, दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष संपलेले नसून तब्बल २८२ टँकरद्वारे ६ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
नाशिक विभागातील ग्रामीण भागात भूजल पातळी अद्याप समाधानकारक वाढलेली नाही. त्यामुळे विहिरी आणि विंधण विहिरी कोरड्या ठाक आहेत. परिणामी, प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच ठेवावा लागत आहे. येवला, सिन्नर, चांदवड आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. ६ लाख नागरिकांची तहान सध्या पूर्णपणे या २८२ सरकारी आणि खाजगी टँकर्सवर अवलंबून आहे.
पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असला तरी तो नद्या आणि धरणांमध्ये जमा होऊन तेथून पाणीपुरवठा योजना सुरू होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत टँकर बंद करता येणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यातही टँकरची वाट पाहावी लागत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
