
इगतपुरी जवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर स्थानिक गुंडांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला होता. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवत मुख्य ९ संशयित आरोपींना मुंढेगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी नाशिक येथील एक कुटुंब भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तेथे काही टवाळखोर तरुणांनी कुटुंबातील महिलेची छेड काढली व अश्लील हावभाव केले. याला कुटुंबातील सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर, चिडलेल्या आरोपींनी त्यांच्या इतर ८-१० साथीदारांना बोलावून घेतले. या टोळक्याने कुटुंबाला बेदम मारहाण केली. पीडित कुटुंब जीव वाचवण्यासाठी कारमधून पळून जात असताना, आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या कारने आणि दुचाकींवरून तब्बल १५ किलोमीटरपर्यंत त्यांचा थरारक पाठलाग केला. लोखंडी रॉड, काठ्या आणि बेसबॉल बॅटने त्यांच्या गाडीवर हल्ला करून काचा फोडल्या.
अखेर पीडित कुटुंबाने नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) डॉ. डी. एस. स्वामी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांची इगतपुरी शहरात धिंड देखील काढण्यात आली आहे. या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी कडक पावले उचलल्याचे चित्र दिसत आहे.
