
नाशिक : आगामी उन्हाळा आणि २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार नाशिकमध्येही १० टक्के पाणीकपात लागू होण्याची शक्यता कायम आहे. मात्र, शहरातील कमी दाबाने होणारा पुरवठा, अनियमित वितरण आणि पाणीगळतीच्या तक्रारी लक्षात घेता सरसकट कपात करण्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असे संकेत पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. त्यामुळे नाशिककरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर महाजन यांनी पाणीकपातीबाबत भूमिका स्पष्ट केली. शनिवारी (दि. २८) महापालिकेत बैठक घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच कपातीबाबत निर्णय होईल.राज्य शासनाने १६ ऑक्टोबरपासून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना किमान १० टक्के कपातीचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, महापालिकेने नियमित पुरवठा आणि सिंहस्थासाठी ८,२८० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली आहे. त्यापैकी ६३५ दशलक्ष घनफूट पाणी सिंहस्थासाठी अपेक्षित आहे. यापूर्वी ६,९७३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे.आजच्या बैठकीत उपलब्ध साठा, दैनंदिन गरज, गळती, वितरणातील त्रुटी आणि सिंहस्थासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे कपातीबाबतच्या निर्णयाकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
