
नाशिक : प्रतिनिधी : शहरावरील पाणीकपातीचे संकट कायम असतानाच वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची अतिरिक्त गरज लक्षात घेऊन महापालिकेने केलेल्या वाढीव पाणीमागणीवर निर्णय घेतला जाणार आहे. पाणीकपात अटळ असली, तरी वाढीव पाणीमागणीचा विचार केल्याशिवाय कपातीचा अंतिम निर्णय घेतला जाणार नाही, असे संकेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. यासंदर्भात पुढील आठवड्यात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लगेचच पाणीकपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी पाण्याच्या उपलब्धतेचा अद्याप सविस्तर आढावा घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले. नाशिकची लोकसंख्या सातत्याने वाढत असून, औद्योगिक क्षेत्राचाही विस्तार होत आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याचे नियोजन करताना या दोन्ही बाबी विचारात घ्याव्या लागतील. त्यातच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची अतिरिक्त गरज निर्माण होणार आहे. महापालिकेने वाढीव पाण्याची मागणी केली असली, तरी सध्याच्या परिस्थितीत अतिरिक्त पाणी देणे शक्य नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठीची आवर्तनेही निश्चित झालेली असल्याने पाणीवाटपाचा ताळमेळ घालावा लागणार आहे.

महापालिकेने २०२६-२७ या जलआरक्षण वर्षासाठी सुधारित प्रस्ताव सादर करत ८ हजार २८० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली आहे. यामध्ये नियमित पाणीपुरवठ्यासाठी ७ हजार ६४५, तर सिंहस्थासाठी ६३५ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आहे. मात्र, यापूर्वी ६ हजार ९७३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव मागणी आणि उपलब्ध साठा यातील तफावत दूर करण्याचे आव्हान आहे. दरम्यान, धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने उपलब्ध साठा टिकविण्याचे आव्हानही वाढले आहे. बाष्पीभवन रोखणे तातडीने शक्य नसल्याचे सांगत महाजन यांनी पाणी नियोजनाची गरज अधोरेखित केली. किकवी धरण प्रकल्पाबाबतही आठवडाभरात विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील बैठकीत वाढीव पाणीमागणी, सिंचनाची आवर्तने आणि पाणीकपात या तिन्ही मुद्द्यांवर निर्णय होण्याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
