
संशयाने घेतला एका तरुणीचा जीव!
नाशिक – नाशिकच्या पेठरोड परिसरात गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना उघड झाली. मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही, म्हणून पतीने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. कोमल सोसायटीत राहणारी पूजा आकाश जाधव (२५) हिचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला. पती आकाश जाधव (३०) हा घटनेनंतर फरार झाला आहे.
*काय घडलं नेमकं?
पूजा आणि आकाशमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवरून वाद सुरू होता. आकाशला पूजाच्या मोबाईलचा पासवर्ड हवा होता. पूजा तो देत नसल्याने तो तिच्यावर संशय घेत होता.गुरुवारी सकाळी हाच वाद टोकाला गेला. रागाच्या भरात आकाशने पूजाचा ओढणीने गळा आवळला. ती ओरडू नये म्हणून उशीने तिचं तोंडही दाबलं. यातच पूजाचा जागीच मृत्यू झाला.
बहिणीला कशी कळली बातमी?
सकाळी पूजाची बहीण सुधा यादव यांना नातेवाईकांचा फोन आला. “आकाशने पूजाला मारलंय, लगेच जाऊन बघ,” असं सांगण्यात आलं.सुधा यांनी धावत घर गाठलं, तेव्हा पूजा बेडवर निपचित पडलेली दिसली. त्यांनी लगेच म्हसरूळ पोलिसांना कळवलं.
म्हसरूळ पोलिसांनी आकाश जाधव विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला असून, त्याच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत.
