
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याची माहिती; यापूर्वीही महापौर निवडीवरून दिला होता राजीनामा
नाशिक : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केल्याचा ठपका ठेवत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तास्थापनेपासून सुरू असलेला भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमत मिळविले. मात्र, त्यानंतरही शहराध्यक्ष सुनील केदार यांनी परस्पर नावे जाहीर केल्याची चर्चा होती. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेत केदार यांना फारसे स्थान देण्यात आले नसल्याचे बोलले जाते. या दोन्ही पदांच्या उमेदवारी निश्चितीबाबत त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचीही चर्चा होती. या घडामोडींमुळे नाराज झालेल्या केदार यांनी महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होताच शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर आपले समाधान झाल्याचे सांगत त्यांनी राजीनामा मागे घेतला. महापालिका निवडणुकीतील उमेदवारी निश्चितीपासून महापौरपदाच्या उमेदवाराच्या निवडीपर्यंत अनेक मुद्द्यांवरून पक्षांतर्गत नाराजी व्यक्त झाली होती. तिकीटवाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप, एबी फॉर्मवरून झालेली ओढाताण आणि उमेदवार निवडीतील कथित मनमानी यांमुळे केदार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यातच महापौर आणि उपमहापौर निवडीत त्यांना डावलण्यात आल्याने नाराजी अधिक वाढल्याचे चित्र होते.
