
नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी शुक्रवारी (दि. २०) महासभेत अधिकृत घोषणा केली. पक्षीय संख्याबळानुसार भाजपला सहा, तर शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे दहा नावे निश्चित करण्यात आली. नावांची घोषणा झाल्यानंतर कार्यपत्रिकेवरील इतर विषयांना तातडीने मंजुरी देत महापौरांनी सभा अवघ्या काही वेळातच आटोपती घेतल्याने सभागृहात उपस्थित सर्वच जण अवाक् झाले.
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून शहरात राजकीय नाट्य रंगले होते. महापालिकेत शिवसेना (उबाठा) व काँग्रेसची ‘शहर विकास आघाडी’ कार्यरत असल्याने या आघाडीच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवरून दोन्ही पक्षांत तीव्र मतभेद निर्माण झाले होते. हा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचला असून, नियुक्ती प्रक्रियेत कोणताही पेच निर्माण होऊ नये म्हणून उबाठाचे गटनेते केशव पोरजे यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते.
सभेपूर्वी सभागृहाच्या परिसरात विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. उबाठाची दोन्ही नावे जाहीर न करता एकच नाव जाहीर करून, दुसऱ्या जागेवर काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक सुफीजीन यांच्या अर्जान्वये सुनील आडके यांचे नाव घोषित केले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत महापौरांनी कायदेशीर व तांत्रिक बाबींची पूर्तता करून दहाही नावे जाहीर केली आणि कोणतीही दीर्घ चर्चा न होऊ देता सभेचे कामकाज गुंडाळले.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त व सतर्कता
स्वीकृत नगरसेवक निवडीच्या पार्श्वभूमीवर सभागृहात तणाव किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने खबरदारी घेतली होती. मनपा मुख्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर सभागृहाच्या आतही साध्या वेशातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या सतर्कतेमुळे आणि महापौरांनी अत्यंत जलद गतीने कामकाज आटोपल्याने संभाव्य वाद व गोंधळ टळला.
