
पाथर्डी (नाशिक) – गेल्या कित्येक दिवसांपासून पाथर्डी शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शिरसाठ मळा परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
दिवसाढवळ्या दिसत होता बिबट्या
पाथर्डीच्या शेतमळ्याच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. लोकवस्तीजवळ, शेतात, रस्त्यावर बिबट्या दिसत असल्याने शेतकरी आणि महिला-लहान मुलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. शेतात जायचं तरी कसं? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता.
गावकऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने शिरसाठ मळा गट क्र. ७४ मध्ये पिंजरा लावला होता. आणि अखेर गुरुवारी पहाटे तोच पिंजरा कामी आला.
पिंजऱ्यात अडकली ३ ते ४ वर्षांची मादी
पहाटे पिंजऱ्यात अंदाजे ३ ते ४ वर्षे वयाची मादी बिबट्या अडकल्याचं समोर आलं. तिला बघण्यासाठी गावातून लोक धावत आले. अनेकांनी मोबाईलवर व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे बिबट्याने काही काळ परिसरात धावपळही केली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्यासह वनविभागाचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी पिंजरा तातडीने वाहनातून सुरक्षित ठिकाणी हलवला. पशुवैद्यकीय पथकाकडून मादीची तपासणी करण्यात आली असून, ती पूर्णपणे सुदृढ असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पण गावकऱ्यांची भीती अजून संपलेली नाही!
एका बिबट्याला जेरबंद केलं असलं तरी या भागात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील सर्व बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पुन्हा पिंजरे लावावेत, अशी जोरदार मागणी आता शेतकरी करत आहेत.
एक बिबट्या पकडला म्हणजे प्रश्न सुटला नाही. इथे अजून बिबटे आहेत. वनविभागाने ठोस उपाययोजना करावी, नाहीतर आम्हाला शेतात जाणंही मुश्किल होईल. असे येथील शेतकरी रहिवाशी म्हणत आहेत.
