
नाशिक : टक्कल असलेल्या व्यक्तींना पुन्हा केस उगवण्याचे आमिष दाखवून सोशल मीडियावर आयुर्वेदिक तेलाची जाहिरात करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील एका ब्युटी सलूनमधून तब्बल ५ हजार ४० बाटल्या आयुर्वेदिक हेअर ग्रोथ ऑइल जप्त करण्यात आले आहे. या जप्त केलेल्या साठ्याची किंमत ५० लाख ३४ हजार ९६० रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावरील जाहिरातींमुळे प्रकरण उघड
मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज रोड परिसरातील विसेमळा येथील एका ब्युटी सलून आणि इमिटेशन ज्वेलरी व्यवसायाच्या माध्यमातून ‘VS Hair Growth Oil’ या उत्पादनाची विक्री केली जात होती. या तेलाच्या जाहिराती इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात येत होत्या.
संबंधित तेलाच्या वापरामुळे टक्कल असलेल्या व्यक्तींनाही पुन्हा केस येऊ शकतात, असा दावा जाहिरातींमधून केला जात असल्याची माहिती FDA ला मिळाली होती. त्यानंतर विभागाने तपासणी करून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
उत्पादनाच्या लेबलवर महत्त्वाची माहिती गायब
तपासणीदरम्यान तेलाच्या बाटलीवरील लेबलवर मार्केटिंग करणाऱ्या संस्थेचे नाव, बॅच क्रमांक, उत्पादन तारीख आणि किंमत नमूद असल्याचे आढळले. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या कंपनीचे नाव, पत्ता आणि उत्पादन परवान्याचा क्रमांक यांचा उल्लेख नव्हता.
प्रत्येक १०० मिली बाटलीची कमाल किरकोळ किंमत ९९९ रुपये होती. संबंधित व्यावसायिकाकडे उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक परवाना आणि इतर कायदेशीर परवानग्या नसल्याचे FDA च्या तपासात समोर आले.
५,०४० बाटल्या जप्त; प्रयोगशाळेत होणार तपासणी
अन्न व औषध प्रशासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत संबंधित तेलाचा संपूर्ण साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या उत्पादनाची प्रत्यक्ष निर्मिती कोणी केली, याचाही शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
नागरिकांना FDA चे आवाहन
टक्कल दूर करणे, पुन्हा केस उगवणे किंवा वजन कमी करणे यांसारखे चमत्कारिक दावे करणाऱ्या सोशल मीडिया जाहिरातींवर नागरिकांनी सहज विश्वास ठेवू नये. कोणतेही औषधी उत्पादन किंवा आयुर्वेदिक उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील उत्पादकाचे नाव, पत्ता आणि आवश्यक परवान्यांची माहिती तपासावी, असे आवाहन FDA कडून करण्यात आले आहे.
या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून चौकशीत समोर येणाऱ्या निष्कर्षांनुसार संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे
