
नाशिक : शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. रस्त्यावर कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे आणि प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना आता आर्थिक दंडाला सामोरे जावे लागत आहे.
नाशिक महापालिकेच्या नवीन घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियम मोडणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांच्या कालावधीत सिडको विभागात तब्बल १ हजार ३७६ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, संबंधितांकडून १७ लाख ४७ हजार १८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी दिली.
रस्त्यावर कचरा टाकणे, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणे तसेच बांधकामाचा राडारोडा अनधिकृत ठिकाणी टाकणे अशा प्रकारांविरोधात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू नये, यासाठी महापालिकेकडून नियमित स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे देणे तसेच कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच जमा करणे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
शहरातील स्वच्छता टिकवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
