पाणी कपातीचा निर्णय दिवाळी सणानंतरच
नाशिक : राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबरपासून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, आगामी दिवाळी सण, उत्सव आणि नाशिकमधील महत्त्वाचे सोहळे विचारात घेता नाशिक महापालिका प्रशासनाने अद्याप १० टक्के पाणीकपात लागू केलेली नाही. दरम्यान, नाशिक शहराची लोकसंख्या, दुष्काळामुळे ग्रामीण भागातून नाशिकमध्ये होणारे संभाव्य स्थलांतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासाठी जादा पाण्याची गरज महापालिकेने अधोरेखीत केली आहे.
एकूण लागणाऱ्या पाण्याच्या अनुषंगानेच नाशिक महापालिकेने ८००५ दशलक्ष घनफुट पाण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये सिहस्थाचा ‘ध्वजारोहण सोहळा’ पार पडणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्याच्या तयारीसाठी सध्या महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची मोठी पळापळ व नियोजन सुरू आहे. त्यामुळे पाणी आरक्षणाचा विषय सध्या लांबणीवर पडला आहे. ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, स्थानिक आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहराचे पाणी आरक्षण तसेच १० टक्के पाणी कपातीबाबतची अंतिम भूमिका आणि धोरण ठरवले जाणार आहे.
……………………………
नाशिककरांना तूर्तास दिलासा
जिल्हाधिकारी कार्यालयातील या महत्त्वाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईपर्यंत नाशिक शहर आणि परिसरातील पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात केली जाणार नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात नाशिककरांचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून नागरिकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
……………………..
स्विमींग पूल, सर्व्हिस स्टेशनही लक्ष
दुष्काळ स्थितीमुळे होणाऱ्या संभाव्य पाणी कपातीबरोबरच महापालिकेकडून शहरातील स्विमिंग पूल तसेच वाहनांचे सर्व्हिस स्टेशन याकडे देखील लक्ष असून, पाणी कपातीच्या निर्णयानंतर पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने महापिालकेला काही कटू निर्णय घ्यावे लागणार असल्याचे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
