
नाशिक : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच गर्दीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरात मोठी वाढ करण्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. काही मार्गांवर बसचे भाडे जवळपास दुप्पट झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. अनेक मार्गांवर आरक्षण उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडावा लागत आहे. मात्र, या संधीचा फायदा घेत काही खासगी बस ऑपरेटरकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
नाशिकसह प्रमुख मार्गांवरील भाडेवाढ
नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई, नाशिक-नागपूर, नाशिक-कोल्हापूर, नाशिक-सुरत आणि नाशिक-बंगळुरू या मार्गांवर तिकीट दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नियमित दिवसांच्या तुलनेत सणासुदीच्या काळात प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
विशेषतः कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांचे बजेट या वाढलेल्या भाड्यामुळे कोलमडत आहे. रेल्वे आणि एसटीचे पर्याय मर्यादित असल्याने खासगी बसचालकांच्या दरवाढीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करा
नियमांनुसार खासगी ट्रॅव्हल्सना एसटी महामंडळाच्या संबंधित श्रेणीतील बसभाड्यापेक्षा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारता येत नाही. तसेच बसमध्ये तिकीट दरपत्रक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्यास संबंधित बसचे नाव, बस क्रमांक, तिकिटाचा फोटो आणि ऑनलाइन बुकिंगचा स्क्रीनशॉट जतन करून आरटीओच्या १८००-२२-०११० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवता येते.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी प्रवासासाठी वाढीव पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आरटीओ आणि परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सच्या भाडे आकारणीवर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
