
नाशिक – सिडकोतील स्टेट बँक चौकाजवळील लिकर कट्टा दुकानात प्रेशर गनमधून अचानक सुटलेला लोखंडी खिळा पोटात शिरल्याने ३९ वर्षीय सेल्समनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील अनिल तायडे (वय ३९, रा. कामठवाडा, नाशिक) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सुनील तायडे दुकानाच्या काउंटरवर बसले होते. त्याचवेळी दुकानात किंवा शेजारी प्लायवुडचे काम सुरू असताना खिळे ठोकण्याच्या प्रेशर गनमधून अचानक फायर झाले. त्यातून सुटलेला लोखंडी खिळा थेट त्यांच्या पोटात शिरल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पत्नी दीपाली तायडे यांनी त्यांना तातडीने खासगी सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री ११.५९ वाजता डॉ. विशाल करवंदे यांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. प्रेशर गनमधून फायर नेमके कसे झाले, यामागे मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड, याचा शोध पोलीस घेत आहेत. फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासाच्या आधारे घटनेचे नेमके कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
