
कुंदन पाटील यांनी ओळखले हुशारीचे कौशल्य; वसतिगृहात प्रवेश देत स्वप्नांना दिली दिशा, एक कोटी रुपये आणि चारचाकी गाडी जिंकत भूषणने रचला इतिहास; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
भुसावळ : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली, तर आयुष्याला नवी दिशा मिळू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण भुसावळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाने घालून दिले आहे. लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) मध्ये सहभागी झालेल्या भूषण ईश्वर ठाकरे याने या पर्वातील पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला आहे.
भूषण हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बलवाडी येथील रहिवासी आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या भूषणला लहानपणापासूनच अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्याने नदीकाठी वाळू उपसण्याचे कामही केले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आवड, ज्ञान मिळवण्याची जिद्द आणि आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा निर्धार त्याने कायम ठेवला.कुंदन पाटील यांनी ओळखले भूषणमधील टॅलेंट!भूषणच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे भुसावळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक कुंदन पाटील यांची भेट. त्यांनी भूषणची आर्थिक परिस्थिती, त्याच्यातील हुशारी, गुणवत्ता आणि शिक्षणाची आवड ओळखली. त्याला शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले.केवळ वसतिगृहात प्रवेश घेण्याचा सल्ला देऊन ते थांबले नाहीत, तर भूषणमधील क्षमता ओळखून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आत्मविश्वास दिला. त्यांच्या या सहकार्यामुळे भूषणच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.’काहीतरी बनल्याशिवाय घरी जाणार नाही!’भूषणच्या जिद्दीचा आणखी एक प्रेरणादायी पैलू म्हणजे वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर त्याने तब्बल दीड वर्षे एकदाही घरी जाणे टाळले. ‘जोपर्यंत मी आयुष्यात काहीतरी बनत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही,’ असा ठाम निर्धार त्याने अधीक्षक कुंदन पाटील यांच्यासमोर व्यक्त केला होता.त्याच्या या शब्दांतून ध्येयाप्रती असलेली निष्ठा, जिद्द आणि कुटुंबाची परिस्थिती बदलण्याची तीव्र इच्छा दिसून येत होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठे यश मिळवण्याचा त्याचा निर्धार आज प्रत्यक्षात उतरला आहे.एकेकाळी उदरनिर्वाहासाठी मजुरी करणारा भूषण आज ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर पोहोचला आहे. या मंचावर त्याने एक कोटी रुपये आणि चारचाकी गाडी जिंकून देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. भूषणचे हे यश केवळ त्याच्या मेहनतीचे प्रतीक नसून योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनाचे महत्त्वही अधोरेखित करणारे आहे.शासकीय वसतिगृह ठरत आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे व्यासपीठ!
कुंदन पाटील यांच्या पुढाकारामुळे शासकीय वसतिगृह हे केवळ विद्यार्थ्यांच्या राहण्याचे ठिकाण नसून त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे केंद्र ठरू शकते, हे सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन दिल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात, याचे भूषण हे उत्तम उदाहरण आहे.समाजकल्याण विभागाच्या योगदानाचे कौतुक!भूषण ठाकरे याचे यश हे केवळ एका विद्यार्थ्याचे वैयक्तिक यश नसून समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह योजनेच्या माध्यमातून गरीब, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक संधींचेही फलित आहे.समाजकल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आणि प्रगतीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. या सुविधांमुळे अनेक गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळत आहे.महाराष्ट्र शासन आणि समाजकल्याण विभागाचे आभार!विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि समाजकल्याण विभागाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.तसेच भूषणच्या यशस्वी प्रवासात मोलाचे योगदान देणारे वसतिगृह अधीक्षक कुंदन पाटील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, भुसावळ येथील संपूर्ण कर्मचारीवृंदाचे विशेष कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.प्रेरणादायी यशोगाथा!’भूषण ठाकरे याने सिद्ध करून दाखवले की, योग्य शासकीय सुविधा, कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान, संवेदनशील मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची प्रबळ इच्छाशक्ती एकत्र आली, तर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीही देशातील प्रतिष्ठित मंचावर आपली ओळख निर्माण करू शकतो.’भूषण ठाकरे, त्याचे कुटुंबीय, अधीक्षक कुंदन पाटील आणि या यशस्वी प्रवासात योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! भूषणच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
