
पोलिसांची विशेष मोहीम; ४० हजारांचा दंड वसूल, दोन सायलेन्सर काढून केले नष्ट
नाशिक : प्रतिनिधीदुचाकी आणि चारचाकी वाहनांना कंपनीकडून बसवून दिलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध नाशिक शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच दोन वाहनांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून ते नष्ट करण्यात आले आहेत.शहरात काही वाहनचालक कंपनीने दिलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी मॉडिफाइड सायलेन्सर बसवत आहेत. या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा मोठा आवाज निर्माण होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा वाहनांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत असून, नागरिकांकडूनही याबाबत तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेला विशेष मोहीम राबवून संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त (गुन्हे) तसेच परिमंडळ एक व दोनच्या पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नाकाबंदी आणि स्टॉप अँड सर्च मोहीम राबविण्यात आली. या वेळी नियमांचे उल्लंघन करून मॉडिफाइड सायलेन्सर बसविलेल्या वाहनांचा शोध घेण्यात आला.या कारवाईत परिमंडळ एकमधील पोलिसांनी १२ वाहनचालकांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. यातील दोन वाहनांचे सायलेन्सर काढून नष्ट करण्यात आले. परिमंडळ दोनमध्ये १० वाहनचालकांवर कारवाई करून १० हजार रुपये, तर शहर वाहतूक शाखेने २० वाहन चालकांवर कारवाई करून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. अशा प्रकारे एकूण ४२ वाहनचालकांवर कारवाई करत ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही नियमित वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे.
