
नाशिक : ‘कृषीथॉन २०२६’ या १९ व्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी (दि. २६) छत्रपती संभाजीनगर मार्गावरील माडसांगवी (शिलापूर टोलनाका जवळ) येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ही माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.उद्घाटनाच्या दिवशी मंत्री भरणे हे बदलते हवामान, हवामानपूरक शेती आणि आधुनिक कृषी धोरणांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कृषी, शिक्षण, दुग्धव्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील चार मान्यवरांना ‘कृषीथॉन विशेष सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे श्रीराम ढोकरे यांना ‘द्राक्षमहर्षी’, के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ यांना ‘कर्मयोगिनी’, अतुल डेअरीचे संचालक नागराज देवरे यांना ‘दुग्धमहर्षी’, तर परफेक्ट कृषी मार्केट यार्डचे संचालक बापूसाहेब पिंगळे यांना ‘कृषी उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.’अधिक व्यापक, अधिक शाश्वत’ ही संकल्पना असलेल्या या प्रदर्शनात ४० एकरांहून अधिक क्षेत्रावर ३०० पेक्षा जास्त स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. ५० हून अधिक पिकांची प्रात्यक्षिके, अत्याधुनिक ट्रॅक्टर्स, शेती अवजारे, जैवतंत्रज्ञान, काटेकोर सिंचन, दर्जेदार बियाणे, जैविक निविष्ठा, दुग्धव्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, सौरपंप, शीतगृह, कृषिमाल मूल्यवर्धन आणि शासकीय योजनांसाठी विशेष दालने असतील.प्रदर्शनाच्या पाचही दिवसांत ‘जलमंथन’, बदलत्या हवामानातील द्राक्ष व डाळिंब शेती, हायटेक नर्सरी, पशुधन व्यवस्थापन, दुग्धव्यवसायाचे भविष्य आणि कृषी सेवा केंद्रांची भूमिका अशा विविध विषयांवर परिसंवाद व चर्चासत्रे होणार आहेत. राज्यभरातून एक लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
