
भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला! बेझे धरणात बुडून पिता आणि दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू
नाशिक : दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणाचा आनंद सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारातील बेझे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या वडिलांसह त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने वाघेरे आणि अंजनेरी परिसरात शोककळा पसरली आहे.
दिवाळीनिमित्त नातेवाईकांकडे आले होते पाहुणे
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील वाघेरे गावातील भोर कुटुंबीय दिवाळीनिमित्त अंजनेरी शिवारातील बेझे धरण परिसरात राहणारे नातेवाईक उत्तम चव्हाण यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते.
बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी सुमारे ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान वडील आणि त्यांच्या दोन मुली धरणात आंघोळीसाठी गेले होते.
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना
धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव पथकाला माहिती दिली. त्यानंतर शोधमोहीम राबवून तिघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
मृतांची नावे
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
- सुरेश नामदेव भोर (वय ४२)
- ज्योती सुरेश भोर (वय १०)
- हर्षदा सुरेश भोर (वय ७)
हे तिघेही इगतपुरी तालुक्यातील वाघेरे गावचे रहिवासी होते.
भाऊबीजेच्या दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दिवाळीच्या सणासाठी नातेवाईकांकडे आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धरणे, तलाव आणि जलाशयांमध्ये जाताना नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
