
नाशिक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा गैरवापर करून महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्हॉट्सॲपद्वारे पाठविलेल्या संदेशातून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जिल्हाधिकारी आणि महसूल विभागातील अधिकारी एकाच बैठकीत उपस्थित असल्याने हा डाव फसला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने महसूल विभागातील प्रांताधिकारी, तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ३० हजार रुपये पाठविण्याचा संदेश देण्यात आला होता. काही वेळानंतर ही रक्कम परत केली जाईल, असेही त्यात नमूद होते. मात्र, त्याचवेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सर्व महसूल अधिकारी नियोजन समितीच्या बैठकीसाठी एकाच कक्षात उपस्थित होते. त्यामुळे एका अधिकाऱ्याने संदेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा करून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, माझ्या नावाने ३० हजार रुपये मागणारा संदेश पाठविण्यात आला आहे. मात्र, असा कोणताही संदेश मी पाठविलेला नाही. नागरिकांनी अशा संदेशांना बळी पडू नये. संदेश प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तीशी किंवा थेट माझ्याशी संपर्क साधून खातरजमा करावी. खात्री केल्याशिवाय कोणालाही पैसे पाठवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
