
नाशिक – : नाशिक जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने गुरुवारी सकाळपासून न्यायालय परिसरात खळबळ उडाली. या धमकीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसरात धाव घेत तपासणी मोहीम हाती घेतली. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने परिसराचा कानाकोपरा तपासण्यात येत आहे.धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत न्यायालय परिसरात तपासणी सुरू केली. न्यायालयाच्या इमारतीसह विविध विभाग आणि परिसरातील संशयास्पद ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. अचानक सुरू झालेल्या या तपासणीमुळे न्यायालयात येणारे वकील, पक्षकार, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
नाशिक न्यायालयाला यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्याने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धमकीचा ई-मेल कोठून पाठविण्यात आला, त्यामागे कोण आहे आणि ही धमकी केवळ अफवा आहे की घातपाताचा प्रयत्न, या दिशेने पोलिसांकडून तपास केला जात आहे.तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
