
उबाठा नगरसेवकांच्या विकासकामांना खोडा!गटनेते केशव पोरजेंचा सत्ताधाऱ्यांवर राजकीय आकसाचा आरोप; दहा लाखांच्या कामांनाही मंजुरी मिळेना, महापौरांच्या दालनात आंदोलनाचा इशारा
नाशिक : प्रतिनिधीमहापालिकेत विरोधी बाकावर बसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागांतील विकासकामांच्या फायली जाणीवपूर्वक अडविल्या जात असल्याचा आरोप पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांनी केला आहे. सत्ताधारी भाजप-शिंदेसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांतील कोट्यवधींच्या कामांना वेगाने मंजुरी दिली जात असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या साध्या दहा लाख रुपयांच्या कामांनाही मंजुरी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर कामकाज सुरू असल्याचा आरोप करत ही परिस्थिती न बदलल्यास महापौरांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोरजे यांनी दिला आहे.जानेवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही शिवसेना ठाकरे पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले. नुकत्याच झालेल्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीत पक्षाला दोन जागा मिळाल्याने सभागृहातील पक्षाचे संख्याबळ वाढले आहे. मात्र, निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना पराभूत करून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागांतील विकासकामांनाच आता खीळ बसत असल्याची भावना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे.
नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील आवश्यक विकासकामांचे प्रस्ताव आणि त्यासंबंधीच्या फायली प्रशासनाकडे सादर केल्या आहेत. मात्र, या फायलींवर निर्णय न घेता त्या प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दहा लाख रुपयांच्या कामांनाही मंजुरी मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागांतील कोट्यवधी रुपयांच्या कामांना मात्र वेगाने मंजुरी दिली जात असल्याचा दावा ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे.विकासकामांबरोबरच सभागृहातील कामकाजाबाबतही ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही, ठराव मागूनही उपलब्ध करून दिले जात नाहीत, तर महापौरांकडे पाठविलेले ठरावही प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप पोरजे यांनी केला आहे. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना केवळ विरोधी बाकावर बसले आहेत म्हणून विकासकामांपासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून, त्यांनी आपली नाराजी गटनेत्यांकडे व्यक्त केली आहे. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करू नये, तसेच सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या गुर्मीत राहू नये, असा इशाराही पोरजे यांनी दिला. येत्या दोन दिवसांत विकासकामांच्या फायली आणि प्रलंबित ठरावांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास शिवसेना ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवक महापौरांच्या दालनात जाऊन तीव्र आंदोलन करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘विरोधकांची कामे राजकीय आकसापोटी अडवू नका'”विरोधी बाकावर असल्याने लोकप्रतिनिधींची कामे राजकीय आकसापोटी अडवली जात आहेत. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचू नये आणि सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या गुर्मीत राहू नये. ठराव मागूनही ते आम्हाला दिले जात नाहीत. महापौरांकडे हे ठराव तसेच पडलेले असतात. ही परिस्थिती तत्काळ न सुधारल्यास येत्या दोन दिवसांत महापौरांच्या दालनात शिवसेनेचे सर्व नगरसेवक तीव्र आंदोलन करतील.”— केशव पोरजे, गटनेते, शिवसेना ठाकरे पक्ष
