
सातपूर : केंद्रातील मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि भांडवलदार धार्जिण्या धोरणांविरुद्ध आता देशभरातील कामगार वर्ग आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. ‘भारतीय ट्रेड युनियन्स केंद्र’ (सिटू) च्या नेतृत्वाखाली येत्या १, २ आणि ३ डिसेंबरला दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर १ लाख संघटित व असंघटित कामगारांचा विराट मोर्चा धडकणार आहे. कामगार मंत्र्यांनी आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतल्याशिवाय एकही कामगार दिल्ली सोडणार नसल्याची माहिती सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. कराड यांनी सांगितले की, १ डिसेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता रामलीला मैदानावरून १ लाख कामगार संसदेवर कूच करतील. सरकारने हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्यास, आंदोलक जागेवरच ठिय्या आंदोलन करून राजधानीची कोंडी करतील. दीर्घ संघर्षानंतर मिळवलेले २९ कामगार कायदे रद्द करून सरकारने लादलेल्या ४ कामगारविरोधी श्रमसंहितांविरुद्ध कामगारांमध्ये तीव्र संताप आहे. या ऐतिहासिक लढ्यात महाराष्ट्रातून तब्बल ६ हजार कामगार व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यामध्ये आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम व घरकामगार, औद्योगिक व कंत्राटी कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी आणि हॉकर्स यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सध्या राज्यभर या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे.दरम्यान, ह्या आंदोलनाच्या पोस्टर व सिटूच्या मार्गदर्शकी चे अनावरण यावेळी करण्यात आले. या महामोर्चात जास्तीत जास्त कामगारांनी सहभागी होऊन सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, महासचिव एम. एच. शेख, खजिनदार के. आर. रघु, जिल्हा अध्यक्ष सीताराम ठोंबरे आणि जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांनी केले आहे.चौकट या आहेत प्रमुख मागण्या कामगारविरोधी ४ नवीन कामगार संहिता तात्काळ रद्द कराव्यात, सर्व कामगारांना दरमहा किमान ४२ हजार रुपये वेतन, सर्व निवृत्त कामगारांना २१ हजार रुपये सार्वत्रिक मासिक पेन्शन लागू करा, वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सर्व कंत्राटी, मानधन व अस्थायी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे व सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त पदे तात्काळ भरा
