
मैत्रीच्या बहाण्याने घरात प्रवेश; १० मिनिटांत १९.८३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!
नाशिक : मैत्रीचे नाते निर्माण करून घरापर्यंत पोहोचलेल्या महिलेने संधी साधत तब्बल १९ लाख ८३ हजार ४०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना नाशिकच्या भाभानगर परिसरात उघडकीस आली आहे. फिर्यादी महिला भाजी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेल्याची संधी साधून संशयित महिलेने अवघ्या दहा मिनिटांत घरातील कपाटातून दागिने लंपास केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी तरन्नुम शब्बीर शेख (वय ३२) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आयषा सद्दाम सैय्यद या संशयित महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिलेने सुरुवातीला फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर दोघींमध्ये मैत्री निर्माण झाली. संशयित महिलेचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणेही वाढले होते. एप्रिल २०२६ मध्ये दुपारी सव्वादोनच्या सुमारास संशयित महिला भाभानगर येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आली होती. यावेळी दोघींमध्ये काही वेळ गप्पा झाल्या. त्यानंतर फिर्यादी महिला भाजी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेल्या. हीच संधी साधून संशयित महिलेने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या चोरीत एकूण १९ लाख ८३ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर काही महिन्यांनी, २१ नोव्हेंबर रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गाढवे करीत आहेत.
दिशा टाइम्स | नाशिक
