
साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन निघालेल्या भाविकांना इगतपुरी येथे मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले. मुक्कामासाठी थांबलेल्या ‘साई निवारा’ इमारतीचा स्लॅब मध्यरात्री अचानक कोसळल्याने १७ साईभक्त जखमी झाले. या घटनेत चार महिलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.मुक्कामादरम्यान अचानक कोसळला स्लॅबशहापूर तालुक्यातील वाशिंद येथील साईभक्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी पालखी घेऊन शिर्डीकडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान त्यांचा मुक्काम इगतपुरी येथील साई निवारा येथे होता. रात्रीचे भोजन झाल्यानंतर सर्व भाविक विश्रांती घेत असताना अचानक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.१७ भाविक जखमी; काहींची प्रकृती चिंताजनकया दुर्घटनेत एकूण १७ भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. दोन भाविकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तीन जणांना फ्रॅक्चर झाले आहे. अन्य दहा जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.मदत पथकांकडून तातडीने बचावकार्यघटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि महामार्ग टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्वांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.साई निवाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हया घटनेनंतर साई निवारा इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या पायी साईभक्तांसाठी अशा निवाऱ्यांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, भाविकांच्या मुक्कामाची व्यवस्था असलेल्या इमारतींची सुरक्षितता नियमितपणे तपासली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाच्या तपासातून दुर्घटनेचे कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.
