
नाशिक (प्रतिनिधी) : दिवाळीनंतर महागाईचा आणखी एक फटका नाशिककरांना बसला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कंपनीने नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजी (CNG) तसेच घरगुती पीएनजी (PNG) गॅसच्या दरात वाढ जाहीर केली आहे. नवीन दर १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.या दरवाढीनुसार सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.२५ रुपयांची वाढ करण्यात आली असून नवा दर ९९.७५ रुपये प्रतिकिलो असल्याचे वृत्त आहे. तर घरगुती पीएनजीच्या दरात प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर १.५० रुपयांची वाढ करण्यात आली असून नवा दर ५१.७५ रुपये झाला आहे.रिक्षा आणि कॅब चालकांच्या खर्चात वाढसीएनजीचा वापर करणाऱ्या रिक्षाचालक, कॅबचालक तसेच खासगी वाहनधारकांना या दरवाढीचा परिणाम जाणवणार आहे. दररोज वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी होणारा खर्च वाढल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.स्वयंपाकघराचे बजेटही वाढणारघरगुती पीएनजी वापरणाऱ्या कुटुंबांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसच्या खर्चात वाढ झाल्याने गृहिणींना घरखर्चाचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे.दरवाढीमागे काय कारण?आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत वाढ झाली आहे. तसेच आयात केलेल्या नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढल्याने पुरवठा खर्चात वाढ झाल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दिवाळीनंतर आधीच विविध जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक त्रस्त असताना आता CNG आणि PNG दरवाढीमुळे नाशिककरांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.
