
: उत्तर भारतीय बांधवांच्या छठपूजा उत्सवानिमित्त रामकुंड आणि गंगाघाट परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. रविवार (दि. १५) दुपारी ३ वाजेपासून सोमवार (दि. १६) सकाळी १० वाजेपर्यंत रामकुंडाकडे जाणारे सहा प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहेत. छठपूजेसाठी सुमारे ५० ते ६० हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.रामकुंड परिसरातील रस्ते अरुंद असल्याने मालेगाव स्टॅण्ड, ढिकले वाचनालय, खांदवे सभागृह, सरदार चौक, गणेशवाडी आणि दिल्ली दरवाजा येथून रोकडोबा मैदानमार्गे रामकुंडाकडे जाणारे तसेच येणारे मार्ग बंद राहतील.शिंदे मळ्यासाठी पर्यायी मार्गशिंदे मळ्याकडे जाण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्ग, ट्रॅक्टर हाउस, नानावली पोलीस चौकी व अमरधाम पूलमार्गे किंवा काट्या मारुती चौक, देवी चौक व पंचवटी अमरधाममार्गे जाता येईल. गणेशवाडी, काट्या मारुती पोलीस चौकी, निमाणी बसस्थानक आणि पंचवटी कारंजा हे पर्यायी मार्गही उपलब्ध असतील.दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाभाविकांच्या वाहनांसाठी गौरी पटांगण आणि शिंदे मळा येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. गौरी पटांगणासाठी मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, सेवाकुंज चौक, काट्या मारुती चौक, देवी मंदिर, मुंजोबा चौक, आयुर्वेद हॉस्पिटल आणि मरीमाता मंदिरमार्गे जाता येईल.पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी १३ नोव्हेंबर रोजी जारी केली आहे.
