
नाशिक – बँकेच्या व्यवहारासाठी नेण्यात येणाऱ्या तब्बल १४ लाख ५०० रुपयांच्या रोकड चोरीचा उलगडा करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. या कारवाईत ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. एकूण १४ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनियन बँक ऑफ इंडियाच्या नाशिक सिटी शाखेशी संबंधित वैभव डोळे यांनी ४ नोव्हेंबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात रोकड चोरीची तक्रार दाखल केली होती. महानगरपालिकेच्या नवीन नाशिक विभागातून बँकेच्या दैनंदिन व्यवहारासाठी रोकड घेऊन जात असताना ही घटना घडली होती.या प्रकरणाचा तपास करताना बँकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. सुरेश हिरामण सोनकांबळे (वय ४०, रा. धर्मवीरनगर, ठाणे) आणि अनुप सुरेश कुमावत (वय ४१, रा. अजिंक्यतारा, सिन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.गुन्ह्याची माहिती मिळताच अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चोरीच्या रकमेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण रोकड आणि चार मोबाईल फोन जप्त केले.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकरी यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास पडोळकर आणि पोलीस अंमलदार वैभव एखंडे करीत आहेत.पोलिसांच्या तत्पर तपासामुळे बँकेच्या रोकड चोरीचा छडा लागला असून संपूर्ण रक्कम हस्तगत झाल्याने या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.
