
नाशिक : शहरातील सायबर गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, आता इंदिरानगर परिसरातील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी मोठा आर्थिक फटका दिला आहे. अवघ्या २७ मिनिटांत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८ लाख ५४ हजार ३३२ रुपये परस्पर दुसऱ्या खात्यांमध्ये वळविण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी तक्रारदार समशेरसिंग चौधरी (वय ६१, रा. पाथर्डी फाटा) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास चौधरी यांच्या मोबाईलवर बँक खात्यातील शिल्लक रक्कम कमी झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी बँक खात्याची माहिती तपासली असता, त्यांच्या परवानगीशिवाय विविध व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.
अज्ञात व्यक्तींनी बँक खात्यातून एकापाठोपाठ अनेक व्यवहार करत मोठी रक्कम इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याचे उघड झाले. अवघ्या २७ मिनिटांच्या कालावधीत एकूण ८ लाख ५४ हजार ३३२ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बँक खाते किंवा मोबाईल हॅक करून फसवणूक करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सायबर फसवणुकीच्या या प्रकाराचा पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा : अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. बँकेचे ओटीपी, पासवर्ड किंवा गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. संशयास्पद बँक व्यवहार आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा आणि १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर तक्रार करा.
सौजन्य : दिशा टाइम्स
