
नाशिकरोड : दिवाळीच्या सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा धोकादायक वस्तू सोबत बाळगणाऱ्या प्रवाशांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
रेल्वे प्रवासात गॅस सिलिंडर, फटाके, रॉकेल, पेट्रोल, डिझेल तसेच इतर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. अशा वस्तू प्रवाशांच्या तसेच रेल्वेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संशयास्पद वस्तू आढळल्यास १३०० वर संपर्क साधा
प्रवासादरम्यान एखाद्या सहप्रवाशाकडे संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आढळल्यास प्रवाशांनी तातडीने जवळच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३०० वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस आणि रेल्वे वाणिज्य विभागाचे कर्मचारी स्थानकांवर तसेच रेल्वे डब्यांमध्ये सामानाची तपासणी करत आहेत. संशयास्पद वस्तूंच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. स्थानकांवर जनजागृती मोहीम प्रवाशांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे स्थानकांवर पोस्टर्स, बॅनर्स आणि ध्वनिक्षेपकांद्वारे प्रवाशांना सुरक्षा नियमांची माहिती दिली जात आहे.
रेल्वे कायद्यानुसार प्रतिबंधित स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होऊ शकते. संबंधित गुन्ह्याच्या तरतुदीनुसार तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांनी सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी नियमांचे पालन करावे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित रेल्वे प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
