
पुणे : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाल्याची घटना शनिवारी (२१ नोव्हेंबर) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या अपघातात छगन भुजबळ सुरक्षित असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ हे ओतूर येथे आयोजित राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनांचा ताफा ओतूर परिसरातून मार्गक्रमण करत असताना हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, ताफ्यातील व्हॅनिटी व्हॅनची पुढे असलेल्या पोलिसांच्या वाहनाला धडक बसली. त्यानंतर मागून येणाऱ्या वाहनांचीही एकमेकांना धडक बसल्याने ताफ्यातील चार वाहनांचा अपघात झाला.
या घटनेत वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, छगन भुजबळ यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या घटनेनंतर भुजबळ समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला.
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याने व्हीआयपी दौऱ्यांमधील वाहनांची सुरक्षा आणि ताफ्याच्या व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि वाहनांच्या नुकसानीबाबत अधिकृत माहिती मिळणे अद्याप बाकी आहे.
सौजन्य : Disha Times
