
स्वीकृतची संधी हुकली; इच्छुकांची आता विभागीय प्रतिनिधित्वासाठी धावपळ!
१८ जागांसाठी लवकरच नियुक्ती प्रक्रिया; विरोधी पक्षनेतेपदासह सभागृहनेतेपदाची नियुक्ती मात्र लांबणीवर
नाशिक : महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित झाल्यानंतर संधी हुकलेल्या इच्छुकांनी आता पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, मर्यादित जागांमुळे अनेकांचा पत्ता कट झाला. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळण्याची शक्यता असतानाच, आता या नाराज इच्छुकांच्या आशा स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधित्वावर केंद्रित झाल्या आहेत. विभागीय स्तरावर मिळणाऱ्या १८ प्रतिनिधींच्या नियुक्त्यांसाठी इच्छुकांची पुन्हा एकदा घोडदौड सुरू होण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांच्या स्तरावर प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण १८ प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रतिनिधींचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदाची संधी हुकलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विभागीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राजकीय पक्षांनाही नाराज इच्छुकांची समजूत काढण्यासाठी या नियुक्त्यांचा आधार मिळू शकतो.
या नियुक्त्यांसाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडून लवकरच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. प्राप्त अर्जांनुसार निवडीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. विभागीय अधिकारी आणि विभागीय सभेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडणार असून, इच्छुकांमधून बहुमताच्या आधारे प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपचे सहा, शिवसेना शिंदे गटाचे दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या गटाचे प्रत्येकी एक, अशा दहा जणांची निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे संधी न मिळालेल्यांनी आता विभागीय प्रतिनिधित्वासाठी राजकीय वजन वापरण्याची तयारी सुरू केली आहे. स्वीकृतची संधी हुकली असली, तरी विभागीय प्रतिनिधित्वाच्या निमित्ताने महापालिकेच्या राजकारणात सक्रिय राहण्याची धडपड इच्छुकांकडून सुरू झाली आहे.
