
श्याम सुंदर, तुषार, विहारसह पाच खाद्य आस्थापनांवर कारवाई; स्वयंपाकघरात कीटक, मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा
नाशिक : मिसळ ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आता मिसळ सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची संक्रांत आली आहे. शहरातील नामांकित मिसळ सेंटरसह चार उपहारगृहांचे परवाने आणि एका कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. सातपूर येथील श्याम सुंदर, कॉलेज रोडवरील तुषार आणि जुन्या गंगापूर नाक्यावरील विहार या प्रसिद्ध उपहारगृहांचाही कारवाईत समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी उपवासाच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या सायंतारा येथे कारवाई झाल्यानंतर आता मिसळ सेंटरवरही प्रशासनाने बडगा उगारल्याने हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील नामांकित हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी (दि. १९) केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या. काही उपहारगृहांच्या स्वयंपाकघरात कीटकांचा वावर होता, तर काही ठिकाणी मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा आढळला. कच्चा अन्नसाठा अस्वच्छ ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. काही हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक जागेचीही कमतरता होती.
या प्रकारांची गंभीर दखल घेत प्रशासनाने एकाच दिवसात पाच आस्थापनांवर कारवाई केली. त्यात चार उपहारगृहांचे परवाने, तर एका कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
दरम्यान, सलग कारवायांमुळे शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रसिद्धीपेक्षा स्वच्छतेला महत्त्व देण्याची वेळ आता हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. मिसळच्या चवीसोबत स्वच्छतेचाही दर्जा राखला जातो का, असा प्रश्न या कारवाईनंतर ग्राहकांकडून उपस्थित होत आहे.
