
पंढरपूर – कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करून सुरुवात झाली. पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी यांच्या शुभहस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील सुधाकर दशरथ शिंदे आणि प्रणिता सुधाकर शिंदे (मु.पो.उंचेगांव खुर्द. ता. हदगांव जि. नांदेड) यांना मान मिळाला. मानाचे वारकरी गेल्या अकरा वर्षापासून पंढरपूर वारी करत असून, त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. परंपरेनुसार आषाढी एकादशीचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होतो, तर कार्तिकी एकादशीचा सोहळा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होतो. कार्तिक एकादशी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक शुक्रवारी पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. आज पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्याने कार्तिकी एकादशी सोहळ्याला सुरुवात झाली. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरात लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. प्रशासनाने या सोहळ्याची जय्यत तयारी केल्याचे चित्र पंढरपूरमध्ये दिसत असून, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा यावरती प्रशासनाने भर दिला आहे.
